पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) 13 सप्टेंबरला होत आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. त्यानुसार देशभरातील 95 हजार विद्यार्थ्यांनी केंद्र बदलून घेतल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) दिली.
“एनटीए’मार्फत “जेईई मेन्स’ आणि “नीट’ परीक्षा घेतली जाते. यंदा मे महिन्यात “नीट’ ही परीक्षा होणार होती. मात्र, करोनामुळे ती सातत्याने पुढे ढकलावी लागली. देशभरातील 15 लाख 97 हजार 433 इतक्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर “जेईई मेन्स’ आणि “नीट’ न घेण्याची मागणी होत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत प्रवेश परीक्षा घेण्यास परवानगी दिली असल्याने या परीक्षा होणार आहे. त्यातील नीट 13 सप्टेंबरला होणार आहे.
या परीक्षेसाठीची प्रवेश पत्रे लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहेत. करोनामुळे उमेदवारांना पाचवेळा केंद्र बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याचा 95 हजार उमेदवारांनी लाभ घेतला. त्यांनी बदलून घेतलेल्या केंद्रानुसार त्यांची व्यवस्था केली आहे, असे “एनटीए’कडून स्पष्ट करण्यात आले.