पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – किडनी (मुत्रपिंड) आजाराबाबत जनजागृतीचा असलेला अभाव तसेच किडनी दान आणि प्रत्यारोपणामध्ये असलेले गैरसमज यामुळे किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रूग्णांना आजही किडनीसाठी कित्येक महिने, वर्षे वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे राज्यातील किडनी प्रत्यारोपण प्रतिक्षा यादी दरवर्षी ३५० पेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. अवघ्या पुणे शहरात आज प्रतीक्षा यादी १ हजार ७२ वर पोहचली आहे.
मधुमेह, उच्चरक्तदाब, औषंधांचे अधिक सेवन, व्यायामाचा अभाव आणि विशेषत: वेळोवेळी किडनीची (मुत्रपिंड) तपासणी केली जात नसल्याने किडनी आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे दिसूनही वेळीच निदान केले जात नसल्यानेही किडनी निकामी होते, प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. अशा स्थितीत चुकीची उपचारपद्धतीमुळेही काही रुग्णांच्या किडनीवर अधिक परिणाम होऊन डायलिसीसपर्यंत जातात. परिणामी, वेळेत किडनी मिळाली नाही तर काहींना जीवही गमवावा लागला आहे.
राज्यात दरवर्षी रस्ते अपघातात 15 ते 16 हजार जणांचा मृत्यु होतो. त्यामध्ये तरूण मृतांची संख्या अधिक आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयवदानाला संमती दिली तर एक मृत व्यक्ती हृदय, दोन किडनी, यकृत, डोळे, त्वचा, फुफ्फुस यासह अन्य अवयव दान करू शकतात.
त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. मात्र, अवयवदान म्हणजे शरिराची चिरफाड, वेळखावूपणा यासह अन्य गैरसमजुतीमुळे नातेवाईक अवयवदानाला संमती देत नाही. त्यामुळे अनेक अवयव उपयोगी असूनही वाया जातात. त्यामुळे नातेवाईकांमध्ये अवयवदानाबाबत जनाजागृती आवश्यकता आहे. अवयवदान झाले तर काही दिवसातच अवयव प्रतिक्षा यादी संपेल, असा विश्वास अवयव प्रत्यारोपण समिती आणि तजद्न्य डाॅक्टरांनी व्यक्त केला.
रुग्णांची वाढती संख्या…
राज्यात दरवर्षी ३५० ते ३७५ किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२१ मध्ये किडनीच्या प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांची संख्या ५ हजार ४२१ होती. तेच दुसऱ्यावर्षी २०२२ मध्ये ५ हजार ७९७ ने म्हणजेच ३७६ने प्रतिक्षा यादी वाढली. २०२३ मध्ये ही प्रतिक्षा यादी ६ हजार १६६ वर पोहचली असून वर्षभरात ३६९ने प्रतिक्षा यादी वाढली आहे.
प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत…
अवयव प्रत्यारोपण समितीने दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात १ हजार ६७२ रूग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत आहे. तर, मागील पाच वर्षांत २२७ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण झाले आहे. यामध्ये २०२० मध्ये ३६ तसेच ३०२१ मध्ये ४९ आणि २०२२ मध्ये 66 यासह २०२३ मध्ये ७४ आणि २०२४ मध्ये २२ (१२ मार्चपर्यंत) जणांवर प्रत्यारोपण झाले आहे.
राज्यातील तीन वर्षांतील स्थिती
वर्षे किडनी दान केलेले किडनी प्रत्यारोपण झालेले
२०२३ २३२ २१७
२०२२ १६९ १६०
२०२१ १३५ १२८