Khashaba Jadhav Cup State Level Wrestling Tournament (उदगीर) :- राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने ग्रीको रोमन, फ्री स्टाईल व महिला गटात वर्चस्व गाजवीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. पुणे व सातारा संघाला उपविजेतेपदाचे मानकरी ठरले.
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सहसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते झाला. क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. श्याम डावळे, दिनेश गुंड राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.
ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूर जिल्हा संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवीत १७२ गुणांसह विजेतेपदावर मोहर उमटवली. पुणे जिल्हा संघाला ९० गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर सांगलीचा संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने सर्वाधिक १३५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे शहर संघाला १३० गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर जिल्हा संघ १२० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. महिला गटात अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा संघाने ११५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सातारा संघाने १०५ गुणांसह दुसरा, तर सांगली संघाने १०५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
कुस्ती स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पोवाडा कार्यक्रम व टी. व्ही. शो गीतकार श्रावणी महाजन यांच्या गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वन्समोरची मागणी करीत रसिकांनी मैदानात जल्लोष साजरा केला.