Khashaba Jadhav Cup State Level Wrestling Tournament (उदगीर) :- लातूर जिल्हयातील उदगीर येथे स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यजमान असलेल्या लातूरच्या पैलवनांनी स्पर्धेत मैदान गाजवून एकूण सहा पदके पटकावली लातूरकरांनी गाजवलेल्या वर्चस्वामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
उदगीर येथे होत असलेल्या क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत लातूरच्या यजमान संघानेही सहभाग नोंदवला आहे. या संघातील ग्रीक रोमन गटातील १० , फ्री स्टाईल गटातील १० व मुलींच्या संघातील ९ कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन पैलवानांनी तीन पदके मिळविली आहेत. यात ५७ किलो वजन गटात फ्री स्टाईल मध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आकाश गट्टे या पैलवानाने दुसरे मेडल मिळविले आहे.
७७ किलो वजन गटातील ग्रीक मध्ये आष्टा ता. चाकूर येथील विष्णू तातनुरे याने तिसरे मेडल मिळविले आहे तर १३० वजनी गटात टाका मासुरडी ता. औसा येथील अक्षय शेळके याने तिसरे मेडल मिळविले आहे. दुसऱ्या दिवशी ग्रीक रोमन गटात ९७ किलो वजन गटात रेणापूरच्या योगेश नागरगोजे याने तिसरे बक्षीस मिळविले आहे. मुलींच्या ५७ किलो वजन गटात औसा तालुक्यातील अंकिता जाधव व ७२ किलो वजन गटात आराधना नाईक यांनी द्वितीय बक्षीस पटकावले आहे.
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला…
लातुर येथील क्रीडा संकुलात खेलो इंडिया कुस्ती केंद्र असल्याने व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेतल्यामुळे लातूर ने हे यश संपादन केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुस्तीच्या मॅट दिल्याने व शासनाकडून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिले जात असल्यामुळे जिल्ह्यात अनेक मल्ल निर्माण होत असल्याचे ही जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे म्हणाले.