मुंबई – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आज सकाळपासूनच सुरु होती. खडसे मागील काही वर्षांपासून भाजपवर नाराज असून ते आपली नाराजी सातत्याने जाहीर करत आले आहेत. खडसेंची नाराजी त्यांच्या पक्षबदलास कारणीभूत ठरेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. मात्र आता याबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं असून राष्ट्रवादीमधील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
याबाबतचे वृत्त नामांकित वृत्तवाहिनी एबीपी माझाने दिलं आहे. या वृत्तानुसार खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना खडसे यांनी, “हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा.” असं वक्तव्य केल्याचं समजत.
तत्पूर्वी, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती हाती लागली होती. मात्र भाजप नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना खडसे भाजप सोडून जाणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केला होता.
याबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘खडसेंना पक्षाने आजवर भरभरून दिल असल्याने ते पक्ष सोडणार नाहीत’ असा ठाम विश्वास व्यक्त केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील खडसेंबाबत प्रतिक्रिया दिली होती. याबाबत बोलताना पाटील यांनी, शरद पवार उपस्थित असलेल्या बैठकीत खडसेंनाबाबत चर्चा झाल्याचे वृत्त नाकारले होते.