नवी दिल्ली – विश्व भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुशांता दत्तागुप्ता यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुलगुरूपदाच्या कार्यकाळात भ्रष्ट वर्तन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
2012 ते 2013 दरम्यान दत्तागुप्ता यांच्याविरोधात भ्रष्ट वर्तनाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षे त्यांची प्राथमिक चौकशी केली गेली होती. त्यानंतर सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.
विश्व भारती विद्यापीठाचे कुलगुरू असतानाच दत्तागुप्ता यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडूनही निवृत्ती वेतन मिळत होते. मात्र दत्तागुप्ता यांनी ही बाब दडवून ठेवली. त्यामुळे त्यांना 13 लाख रुपयांचे अतिरिक्त वेतन मिळत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय दत्तागुप्ता यांनी विद्यापीठाच्या कायदेशीर कामकाजासाठी एक खासगी लॉ फर्मही चालवली होती. या वकिलीतून सरकारी मान्यताप्राप्त वकिलांपेक्षा अधिक शुल्क आकारले जात होते. खातेनिहाय चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांना दत्तागुप्ता यांनी नियमबाह्य पद्धतीने 5 लाख रुपयांचे सन्मानवेतन दिले होते, असा आरोपही सीबीआयने केला आहे.