ठाणे: भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपकडून अद्याप तरी उमेदवारी देण्यात आली नसून, त्यामुळे खडसे बंडखोरी करतात कि काय अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडसेंबद्दल एक गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
‘भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत,’ असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी आज केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आलं आहे.
उमेदवारी न मिळाल्यान खडसे नाराज असून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्यावर मोठा दबाव येत आहे. नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी जळगावला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. हे सगळं सुरू असतानाच शरद पवार यांनी आज खडसे संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पवार उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला योग्य संधी मिळाली नाही की तो पर्यायाच्या शोधात असतो. खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत,’ असं ते म्हणाले. तसंच, विजय नाहटा यांचा जन्मच बारामतीमध्ये झाला होता, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
पवारांना भेटलेलो नाही: खडसे
शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा खडसे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. ‘तीन महिन्यांत काय, तीन वर्षांत कोणत्याही पवारांशी माझी भेट झालेली नाही. भाजप सोडण्याचा असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही,’ असं खडसे यांनी स्पष्ट केलं.