नवी दिल्ली – खादीची नवनवीन आकर्षक उत्पादने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे खादीची लोकप्रियता वाढू लागली आहे. खादीच्या एकाच दुकानातून एकाच दिवशी तब्बल 1.29 कोटी रुपयाच्या खादीची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
लघु उद्योग मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील खादी शोरूम मध्ये 30 ऑक्टोबर रोजी खादीची वस्त्रे विकत घेण्यासाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केली. दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी खादीची उत्पादने वापरावीत असे आवाहन ग्राहकांना वेळोवेळी करत असतात. त्याला नागरिकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
दिल्लीत देशभरातील राज्यकर्त्यांची वर्दळ असते. त्यांच्याकडून कनॉट प्लेसमध्ये खादीचे कपडे खरेदी केले जातात. 30 ऑक्टोबर रोजी झालेली विक्री हा एक विक्रम असल्याचे सांगण्यात आले. या अगोदर 2 ऑक्टोबर 2019 मध्ये या दुकानातून 1.28 कोटी रुपयांच्या खादीची विक्री झाली होती. एकाच दिवशी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खादीची विक्री होण्याची ही तेरावी घटना आहे. खादीची विक्री वाढावी याकरिता केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत असून आगामी काळातही खादी वापराला चालना देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.