वडगाव मावळ, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांना होण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. १५) ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी (ता. मावळ) येथे सकाळी ११ वाजता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मंडळामार्फत मध केंद्र योजना राज्यात कार्यान्वित झाली असून या योजनेअंतर्गत समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो.
मध योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते. तसेच मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आदी योजना राबविण्यात येतात.
या योजनेअंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. या शिबीरामध्ये कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती आदी कार्यालयांचा सहभागी होणार आहेत.
शिबिरासाठी निःशुल्क प्रवेश असून अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.