श्रीगोंदा – लोकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर नगरसेवक मनोहर पोटे आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. लोकनियुक्त नगराध्यक्षा पोटे यांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर आज (बुधवार) सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या दालनात सुनावणी झाली.
या सुनावणीत नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी अवधी मागितल्याने या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. समजलेल्या माहितीनुसार सुनावणीनंतर उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील कामानिमित्त दालनाबाहेर पडले. ते बाहेर पडताच नगरसेवक मनोहर पोटे यांनी 16 नगरसेवकांना उद्देशून बोलण्यास सुरुवात केली.
“ही बोलण्याची जागा नाही आणि येथे महिलाही उपस्थित आहेत याचे भान राखा’, असे म्हणत नगरसेविका छायाताई गोरे यांनी मनोहर पोटे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी अन्य नगरसेवकही बोलू लागले. त्याचदरम्यान मनोहर पोटे आणि नगरसेवक अशोक खेंडके यांच्यातही चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी पोटे यांनी महिला नगरसेवकांना अपशब्द वापरल्याचा आरोप विरोधकांनी केला.
दरम्यान, श्रीगोंद्याच्या नगरसेवकांमध्ये थेट उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच खडाजंगी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.
नगरपालिकेतील फोडाफोडीच्या राजकारणासाठी आर्थिक व्यवहार झाले आहेत. आमचा कारभार स्वच्छ असून, ते आम्ही सिद्ध करू.
मनोहर पोटे, नगरसेवक
अपात्रतेच्या प्रस्तावावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला प्रकार अशोभनीय आहे. सगळ्यांनी मर्यादा पाळण्याची गरज आहे.
अशोक खेंडके, नगरसेवक