पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने 2019 मध्ये शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरणात मुबलक पाणी साठा आहे. तरीही, महापालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पूर्ववत केला आहे. त्यामुळे निगडीतील यमुनानगर, सेक्टर 22 आदी भागासह दिघी, चऱ्होली, मोशी भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज पाणी देण्याची नागरिकांकडून मागणी असताना त्याकडे पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरून महापालिका भवनातील पाणी पुरवठा विभागासमोर प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. दररोज पाणी द्या, आयुक्त साहेब दररोज पाणी द्या, असा टाहो फोडत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दररोज पाणी दिले नाही, तर याहून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
आंदोलनात शहराध्यक्ष सचिन चिखले, बाळा दानवले, रुपेश पटेकर, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, अंकुश तापकीर, विशाल मानकरी, राजू साळवे, सुशांत साळवी, सुरेश सकट, नितीन चव्हाण, शिवकुमार लोखंडे, जितेंद्र वाल्हेकर, आकाश पांचाळ, गणेश भोंडवे, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, श्रद्धा देशमुख, अनिता पाटील
उपस्थित होते.