शंकर दुपारगुडे
कोपरगाव – प्रसूतीची वेळ नाही. प्रसूतीला तब्बल एक महिना बाकी आहे. पती-पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. भाऊ डॉक्टर आहेत. वेळेवर औषधोपचार सुरू आहेत. वेळेवर तपासण्या केल्या. कोणताही धोका नाही, म्हणून रेल्वेने सुखरूप प्रवास करण्यासाठी गोवा एक्स्प्रेसने कोपरगावच्या दिशेने प्रवास करण्यासाठी बसलेल्या सोनाली गाढे यांना अचानक प्रसुती वेदना होवू लागल्या आणि सोबत असलेल्या पाच वर्षाच्या परीने प्रसंगावधान दाखवून आपल्या आईच्या वेदना नातेवाईकांना कळवून एका धोकादायक घटनेतून आपल्या आईचे व नवजात बालकाचे प्राण वाचवून “देव तारी त्याला कोण मारी’ याचा अनुभव सोनाली गाढे यांनी बुधवारी अनुभवला…
या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगाव माहेर असलेल्या सोनाली सतीश गाढे आपल्या पतीसह गोवा येथे एका वैद्यकीय खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना परी नावाची 5 वर्षांची मुलगी आहे.सोनाली या दुसऱ्यांदा गरोदर असून, त्यांना आठवा महिना लागल्याने त्या प्रसूतीसाठी माहेरी येण्यासाठी गोवा- निजामुद्दीन एक्सप्रेस या रेल्वेत बसल्या. त्यांच्या सोबत त्यांची आई लता सुधाकर नरोडे (वय 55) व त्यांची पाच वर्षांची मुलगी परी ऊर्फ सर्वज्ञाही होती. गोव्यापासून प्रवास सुखरूप सुरू झाला. मात्र, बुधवारी पहाटे रेल्वे पुण्यापासून पुढे लोणी काळभोरपर्यंत आली आणि सोनाली यांच्या पोटात अचानक वेदना सुरू झाल्या.
प्रसूतीचा महीना बाकी असताना पोटात दुखत असल्याने नक्की काय होते हे कळण्याच्या आतच पुन्हा जोरात प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. एका बाजूला कडाक्याची थंडी, वाऱ्यासारखी धावणारी रेल्वे आणि प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने काय करावे कळत नव्हते. बेशुद्धावस्थेत सोनाली तळमळत होत्या. लांबचा प्रवास असल्याने रेल्वेतील प्रवासी पहाटेच्या साखरझोपेत होते; परंतु परी मात्र आईची तळमळ पाहत जागी होती. परीने आईच्या मोबाईलवरून आपल्या मामाला डॉ. सागर नरोडे यांना रेल्वेतील घटनाक्रम सांगितला. डॉ. नरोडे यांना बहिणीची अवस्था धोक्यात असल्याचे लक्षात येताच संबंधित रेल्वेतील प्रमुखांशी बोलून रेल्वे थांबवण्याची विनंती केली. रेल्वे तोपर्यंत पुण्याच्या पुढे गेली होती.
रेल्वेत वैद्यकीय सेवा मिळण्याची शक्यता नव्हती. मात्र, सोनाली यांची अवस्था अतिशय बिकट होत असल्याचे वारंवार परी सांगत होती. अखेर डॉ. नरोडे यांनी दौंड येथील त्यांचे मित्र डॉ. विक्रम दिवेकर यांना फोन करून घटनेची माहिती दिली; पण रेल्वे दौंडपर्यंत येण्याअगोदर काहीही होऊ शकते याची कल्पना आल्याने रेल्वे केडगाव (चौफुला) स्थानकावर थांबवण्याची विनंती केडगाव स्टेशन मास्तरला केली. स्टेशन मास्तर अभिजित मेहरूळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन थांबा नसतानाही केडगाव येथे गोवा एक्स्प्रेस पहाटे साडेपाच वाजता थांबवण्याची व्यवस्था केली. डॉ. दिवेकर यांनी फोनवरून डॉ. गीताराम वाकचौरे यांना घटनाक्रम सांगितला. क्षणाचाही विलंब न करता डॉ.वाकचौरे यांनी स्वतः एक रिक्षा व स्ट्रेचरची व्यवस्था करून रेल्वे रूळाच्या बाजूला थांबले. जर रुग्णवाहिकेमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था केली असती तर रेल्वे रूळाजवळ रुग्णवाहिका जाणार नव्हती व तीन किलोमीटर पुलाला वळसा घालून येईपर्यंत उशीर होऊ शकतो याचा विचार करून रिक्षा करण्यात आली.
रेल्वेतून सोनाली यांना तातडीने खाली उतरवून रिक्षातून डॉ. निवेदिता वाकचौरे यांच्या चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी परी आईच्या गरोदरपणातील तपासण्या केलेले कागदपत्र दाखवत डॉक्टरांना मदत करीत होती. हॉस्पिटलमध्ये दाखल करताच काही क्षणाचाही विलंब न होता गाढे यांची प्रसूती डॉ. वाकचौरे यांनी धोकादायक अवस्थेत असूनही साध्या पद्धतीने करून बाळासह आईला जीवदान दिले. आईने प्रवासादरम्यान एका बाळाला सुखरूप जन्म दिल्याची गोड बातमीसुद्धा परीने नातेवाईकांना आनंदाने सांगितली. दरम्यान, डॉ. नरोडे नाशिक येथून केडगावला सकाळी पोहोचले. नवजात बाळाची व बहिणीची तब्येत सुखरूप असल्याची माहिती कळवून देवदूतासारखे धावून आलेल्या रेल्वे स्टेशन मास्तर अभिजित मेहरुळ व सर्व डॉक्टरांचे आभार मानून विशेष कौतुक परीचे केले. परीच्या समयसूचकतेमुळे आज माझी बहीण व बाळ सुखरूप आहे, अशी प्रतिक्रिया दै. प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
सुखरूप प्रसूती
रेल्वे प्रवासादरम्यान संकटकालीन प्रसूतीतून सुखरूप प्रसूती झाली. परीच्या जोडीला लहान बहीण जन्माला आली. आईसह नवजात बालिका सुखरूप कोपरगावच्या दिशेने येणार आहेत.
परीची तत्परता वाखाणण्याजोगी
रेल्वेत आईला त्रास होतो हे बघून परी कासावीस झाली. परीने डॉक्टरांना पाहिजे त्या फाईल दाखवणे, संबंधित नातेवाईकांना फोन करणे हे सगळं एवढ्याशा परीने केले. परीने दाखवलेल्या तत्परतेचे आम्हाला कौतुक वाटते, अशी भावना परीच्या मावशी व कोपरगाव नगरपालीका शाळेतील शिक्षिका मंगल पवार यांनी व्यक्त केली.