नवी दिल्ली- पंजाब पोलिसांनी भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना केलेल्या अटकेवरून देशाची राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कॉंग्रेस नेते नवज्योत सिध्दू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्यावर सूडाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करणारे भाजप प्रवक्ते तेजिंदरसिंग बग्गा यांना आज पंजाबच्या पोलिसांनी त्यांच्या घरून अटक केली. या घटनेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
एकीकडे दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या तावडीतून परत आणण्यासाठी आकाशपाताळ एक केले. दुसरीकडे कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्यावर सूडाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. सिध्दू यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तेजिंदर बग्गा वेगळ्या पक्षाचे असले तरी सूडाचे राजकारण करून आपचे सरकार पाप करीत आहे.
तजिंदर पाल बग्गा यांची अटक चित्रपटातील कथानकाला शोभावी अशी आहे. या अटकेवरून मोठी ड्रामेबाजी बघायला मिळाली. पंजाब पोलिसांनी बग्गा यांना आज सकाळी त्यांच्या घरून अटक केली. बग्गा यांना पंजाबला घेवून जात असतानाच हरियाणा पोलिसांनी पंजाबच्या पोलिसांना रस्त्यातच थांबविले. यानंतर हरियाणा पोलिसांनी बग्गा यांना आपल्या ताब्यात घेतले आणि नंतर दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले. पंजाबच्या पोलिसांनी पूर्वसूचना न देता ही कारवाई केली, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वैयक्तिक हिशेब बरोबर करण्यासाठी पंजाब पोलिसांची प्रतिमा खराब करीत आहेत, असा आरोप सिध्दू यांनी केला आहे. या कारवाईसाठी सिध्दू यांनी भगवंतसिंग मान यांचाही समाचार घेतला.
दरम्यान, पंजाब पोलिसांनी आपल्याला मारझोड केली, असा आरोप बग्गा यांचे वडील प्रितपाल बग्गा यांनी केला आहे. तर, आई कमलजीत कौर यांनी सुध्दा केजरीवाल यांच्यावर मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप केला आहे.