नवी दिल्ली – कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनीही पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. पक्षात राहुल हेच पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. कॉंग्रेसजनांची ते एकमेव पसंती आहेत, असे खुर्शिद यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास राहुल उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षापुढे मोठा पेच उभा राहिल्याची चर्चा आहे. अशात कॉंग्रेसने रविवारी पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर खुर्शिद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पक्षातील सर्वांनाच राहुल अध्यक्षपदी हवी असल्याचे सूचित केले.
राहुल सध्या परदेशात आहेत. तिथून परतल्यानंतर अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राहुल यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल यांच्या बाजूने जोरदार बॅटिंग केली.
कॉंग्रेसचा 2019 मध्ये सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झाला. त्या पीछेहाटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी पक्षाची धुरा सांभाळत आहेत. (Rahul Gandhi is the number one leader in the party, he should be the party president – Salman Khurshid)