सातारा -खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी बोलावलेल्या सातारा विकास आघाडीच्या बैठकीत सातारकरांच्या हितासाठी पालिकेचा कारभार गतीमान ठेवा, अशा सूचना उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत अनेक विषयांवर नुसतीच चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही. लक्ष्मी टेकडी येथील घरकुलाची कामे, करंजे येथील पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद या रखडलेल्या कामांचा उदयनराजे यांनी आढावा घेतला. तर स्पर्धा असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या ठेक्यांचे वाटप करण्याकरता ठेकेदारांना सोमवारी पालिकेत बोलावून त्याचे नियोजन करण्याच्या सूचना उदयनराजे यांनी दिल्या.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंग पाळत सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची दीड तास बैठक घेतली. नगरसेवक वसंत लेवे व विशाल जाधव यांची बैठकीस अनुपस्थित होते. सविता फरांदे प्रकृती अस्वास्थामुळे हजर नव्हत्या. या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी 2016 च्या आघाडीचा जाहीरनाम्यातील उल्लेखित प्रलंबित विकास कामांचा आढावा घेतला. लक्ष्मी टेकडी येथील “बीव्हीजी’ कंपनीने घरकुलांची कामे पूर्ण केली. मात्र, त्यात अनेक त्रुटी राहून गेल्या, या विषयावर ही कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. गेल्या साडेतीन वर्षात आपण शहरात मोठे प्रकल्प सातारकरांच्या हितासाठी उभे केले आहेत. कोणतीही विकास कामे अपुरी राहता कामा नये, करंजे येथील पाण्याच्या टाकीच्या जागेचा विषय तांत्रिक बाजू तपासून सामंजस्याने सोडवण्याची सूचना उदयनराजे यांनी केली.
रस्ते निविदांमध्ये संबधित ठेकेदारांना कामे हस्तांतरित करण्यासाठी त्यांना सोमवारी पालिकेत बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात यावी, असे आदेश उदयनराजे यांनी पालिका प्रशासनाला दिले. येत्या 10 जुलै रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. मात्र, ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना नगर विकास विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ती व्यवस्था कशी असणार याची माहिती घेण्याचा उदयनराजे यांनी प्रयत्न केला. मात्र, बैठकीत पुरेशा माहितीअभावी सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. सातारकरांना घरपट्टी माफ करण्यात यावी, असा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला आहे. मात्र, हा विषयच 1965 नगरपालिका अधिनियमाच्या विरोधात असल्याने हा विषय नामंजूर होण्याची चिन्हे आहेत.
घरपट्टी माफीच्या प्रस्तावामुळे पालिकेत आर्थिक चणचण वाढून दैनंदिन खर्च आणि देयके या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात, अशी भूमिका नगरसेविका सुजाता राजेमहाडिक यांनी मांडली. मात्र, या विषयामागे मोठी राजकीय भूमिका आहे, असे माजी पक्ष प्रतोद ऍड दत्ता बनकर यांनी सांगितले. सातारकरांच्या हितासाठी पालिकेचा कारभार गतिमान ठेवा, अशा सूचना उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अनेक विषयांचा आढावा उदयनराजे यांनी घेला.