नवी दिल्ली -भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के.कविता यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या त्या कन्या आहेत.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणावरून कविता ईडीच्या रडारवर आल्या आहेत. त्यांची याआधी तीनवेळा चौकशी झाली. आता त्यांना उद्या (मंगळवार) पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
मात्र, कविता चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. कविता यांचा निर्णय ईडीला ई-मेलद्वारे कळवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित प्रकरणात कविता यांना चौकशीसाठी बोलावण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्याकडे त्यांच्या निकटवर्तीयांनी लक्ष वेधले.
मात्र, कविता यांना न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. तो आता अस्तित्वात नाही, अशी भूमिका ईडीने घेतल्याचे समजते. विधान परिषदेच्या सस्या असणाऱ्या कविता यांची याआधी सीबीआयनेही चौकशी केली होती.