कात्रज – मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवीन बोगदा तसेच नवले पूलावर होणारे अपघात याची चर्चा सातत्याने होत असताना जुना कात्रज बोगदा घाट रस्त्याची देखभाल, दुरुस्तीकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. घाट रस्त्याच्या साइडपट्ट्या उखडलेल्या आहेत. बहुतांशी ठिकाणी कोसळलेले दगड धोकादायक स्थितीत आहेत.
संरक्षक भिंतीच्या बाजूस मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. पावसाळ्यानंतर ही झाडेझुडपे काढणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाले आहे. घाटातील सूचनाफलक तसेच मैलाचे दगड याचीही मोठी दुरवस्था झाली आहे. घाटात संरक्षक कठडे बहुतांशी ठिकाणी तुटले आहेत.
कात्रज घाटामार्गे पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी अनेक वाहने जुना बोगदा मार्गावरून जातात. पुणे शहरातील दक्षिण भागातील अनेक दुचाकीस्वार यामार्गे व्यवसायानिमित्त, कामानिमित्त घाटा ओलांडतात यामुळे घाटात रात्रं-दिवस मोठी वर्दळ असते. त्यामुळे घाटाच्या देखभालीसह दुरूस्ती गरज आहे.
घाटात वळणावर रिफ्लेक्टर्स गरजेचे…
कात्रज-जुना बोगदा घाटामार्गात कोठेही चमकण्याऱ्या साइड पट्ट्यांसह, वळणावर रिफ्लेक्टर्स नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. घाटातील संरक्षक कठड्यांचीही दुरूस्ती होणे गरजेचे असल्याचे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.