मुंबई: राज्यातील करोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून उत्तर मुंबईत अक्षरशः कहर केला आहे. उत्तर मुंबईतील मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहीसर भागात काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या भागात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा, असा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून पालिकेला देण्यात आला आहे. पण सद्यस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करणे शक्य नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
या संदर्भात नुकतीच मुंबई पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई पोलिसांनी गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र सध्या लॉकडाऊन लागू करणे व्यवहार्य नसल्याचे म्हटले आहे.
दहिसरमध्ये करोनाचा डबलिंग रेट मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. आर-नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या या ठिकाणी 16 दिवसांचा डबलिंग रेट असून शुक्रवारी 1318 करोना रग्णांची नोंद झाली. तर शेजारील आर-सेंट्रल वॉर्ड ज्यामध्ये बोरिवली पश्चिमेचा भागही येतो तिथेही डबलिंग रेटचं प्रमाण मोठे आहे. 18 दिवसांचा डबलिंग रेट असणाऱ्या या वॉर्डमध्ये शुक्रवारी 1882 रुग्णांची नोंद झाली. शनिवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट 34 दिवस आहे.
आणखी एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू
करोना विरोधातील लढ्यात आघाडीच्या योद्धांपैकी एक असलेले पोलीस देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मागील 24 तासांत राज्यात 88 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले असून, एका पोलिसाचा करोनानेमुळे मृत्यू झाला आहे. तर, राज्यातील करोनाबाधित पोलीसांच्या संख्येने आता 4 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात करोनाबाधित पोलिसांची संख्या 4 हजार 48 वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत 47 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.