सातारा (प्रतिनिधी) – येथील गुरुवार पेठेतील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशन दुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत धान्यसाठ्यासह विविध प्रकारचा माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी, श्रीकांत शेटे हे राहत असलेल्या घराच्या पार्किंगमध्येच त्यांचे ऑफिस व रेशन दुकान आहे. त्यांच्याकडे विविध कंपन्यांच्या एजन्सीज आहेत. हा सर्व माल आणि धान्याची पोती ते पार्किंगमध्येच ठेवत होते. घरातील सर्व जण रविवारी पहाटे गाढ झोपेत असतानाच शॉर्टसर्किटमुळे पार्किंगमध्ये अचानक आग लागली. आगीमुळे सर्वत्र धूर पसरल्याने शेटे यांच्या कुटुंबातील काही जणांना जाग आली. त्यांनी पेठेतील इतर लोकांना याची माहिती दिली.
तेथील नागरिकांनी शेटे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यातील काहींनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर केवळ 15 मिनिटांत अग्निशमन दलाचे बंब व जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सुमारे अर्ध्या तासांनंतर आग आटोक्यात आणली.
तोपर्यंत या आगीत विविध कंपन्यांच्या बिस्किटांचे बॉक्स, तयार आट्याची पोती, 30 किलो डाळ, इतर धान्याची शंभर पोती, पाच विद्युत मीटर, विद्युत मोटारी, सीसीटीव्ही कॅमेरे आदी साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाला पाणी फवारावे लागल्याने तांदूळ व गहू भिजून खराब झाला. केवळ 16 पोती सुरक्षित राहिली. आगीची माहिती मिळाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या आगीत शेटे यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तात्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
घरातील लोकांना टेरेसवर पाठवले
शेटे यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना रविवारी पहाटेच्या सुमारास पार्किंगमध्ये आग लागली. त्यामुळे घरात धूर आल्याने श्रीकांत शेटे यांनी महिला व लहान मुलांना खबरदारी म्हणून टेरेसवर पाठविले. धुरामुळे घरातल्या लोकांना श्वास घेताना त्रास होत होता. मात्र, आग वेळेत आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.