केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना करोना

नवी दिल्ली -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. ही माहिती रिजिजू यांनी स्वतः ट्‌विटरवरुन दिली आहे. “करोनाची पुन्हा तपासणी झाल्यानंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी डॉक्‍टरांचा सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाइन व्हावे आणि स्वतःची चाचणी करावी. मला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत आहे, असे रिजिजू यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

टिहरी येथे शुक्रवारी “वॉटर स्पोर्टस अँड ऍडवेंचर इन्स्टिट्यूट’ या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी रिजिजू उत्तराखंडमध्ये गेले होते. या उद्‌घाटन सोहळ्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावतही त्यांच्यासमवेत होते. रावतही नुकतेच करोनातून सावरले आहेत.

गुरुवारी रिजिजूंनी उत्तरकाशी जिल्ह्यातील निलोंग व्हॅली प्रदेशला भेट दिली. यात इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) महासंचालक सुरजितसिंग देसवाल हे देखील त्यांच्यासमवेत होते.

खेळांव्यतिरिक्त, रिजिजू यांना अलीकडेच आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीचा (आयुष) अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

कारण या पदावरील श्रीपाद येसो नायक यांना अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुणाचल प्रदेशच्या अरुणाचल पश्‍चिम मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार रिजिजू अल्पसंख्याक कार्यमंत्री देखील आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.