मुंबई – राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना राजकीय नेत्यांमध्ये त्यांचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील कॉंग्रेस आणि भाजपच्या दोन आमदारांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. या दोन्ही आमदारांची करोना टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या आमदारांना काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची करोना चाचणी घेतली असता शनिवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपर्कात एक स्थानिक नगरसेवक आला होता. ज्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
तसेच ठाण्यातील एका 40 वर्षीय आमदारांची आरोग्य तपासणीवेळी करोना चाचणी घेण्यात आली होती. या संबंधित आमदारांचा अहवालही आज पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांच्यावर मुंबईजवळील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.
दरम्यान, यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली होती. या तिघांनीही करोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.