चेन्नई – तुतीकोरीन जिल्ह्यात पोलीस कोठडीत पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात साथानकुलमचे न्याय दंडाधिकारी बी. सर्वानन यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी के. चंद्रू यांनी केली आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.
या प्रकरणात न्याय दंडाधिकाऱ्यांचा न्यायिक अनुचित व्यवहार, अटक करण्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि गैरवर्तन स्पष्टपणे दिसते. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, असे के. चंद्रू यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आणि न्याय दंडाधिकाऱ्यांनीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अटकेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. आरोपींना हजर केले त्यावेळी त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही, असे सांगून साथानकुलमचे न्याय दंडाधिकारी स्वत:चे हात झटकू शकत नाही, असेही ते म्हणाले.
ते जर जखमी अवस्थेत होते, रक्तस्राव सुरू होता त्यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्या दुखापतीची चौकशी करायला हवी होती. पिता-पुत्र दोघांमध्येही त्राण नसतील ते लंगडत चालत असतील तर न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारला पाहिजे होता. ते न्याय दंडाधिकाऱ्याचे काम आहे. साथानकुलमच्या न्याय दंडाधिकाऱ्याने कायदा आणि देशाच्या संविधानाचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी के. चंद्रू यांनी केली.