बेंगळुरू – कर्नाटकातील सत्ताधारी कॉंग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच हमींच्या अंमलबजावणीत दिरंगाई केल्याचा आरोप करीत भाजप सदस्यांनी कर्नाटक विधानसभेत जोरदार गदारोळ केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. आज भाजप आमदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये घुसून सत्ताधारी कॉंग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यामुळे सभापती यू टी खदेर यांनी कामकाज काही काळासाठी तहकूब केले.
सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला आणि तारांकित प्रश्न उपस्थित करण्यास परवानगी दिल्याने कामकाजाला सुरुवात झाली. पण त्यावेळी कॉंग्रेसने निवडणुकीत दिलेल्या हमींच्या अंमलबजावणीत दिरंगाई केल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्थगन सादर केला व त्यावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली.
सभापतींनी भाजपला प्रश्नोत्तराचा तास होऊ द्यावा, असे वारंवार आवाहन केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पाच हमीभावांचे यश भाजपला सहन होत नसल्याचे सांगत भाजपवर टीकास्त्र सोडले.