आकाश कंदीलांनी सजली कराडची बाजारपेठ

सजावटीसाठी मोठ्या आकाराबरोबरच छोट्या आकारातील कंदिलांनाही नागरिकांकडून मागणी
कराड  – अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावलीसाठी कराडची बाजारपेठ विविध आकारातील आकाश कंदीलांनी सजली आहे. मोठ्या आकाश कंदीलांबरोबरच सजावटीसाठी छोट्या आकारातील आकाश कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे.
मांगल्याचे प्रतिक असणारा हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो. दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदीलांची मागणी वाढते.

पारंपरिक आकार आणि प्रकारांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन प्रकार आकाश कंदीलात पहावयास मिळतात. हंडी कंदील, पर्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या कंदीलांनाही उत्तम प्रतिसाद असतो. हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहेत. पॉल, मेटॅलिक, चायना प्लास्टिकचे प्रकार, रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, झगमगते आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत.

वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांतून पडणाऱ्या या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते. दिवाळी पहाट, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी प्रत्येक घराबाहेर लावलेले आकाशकंदील मन मोहून टाकतात. दिवाळीची रोषणाई खऱ्या अर्थाने जाणवते ती लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या माळा आणि झगमगणाऱ्या आकाश कंदीलांमुळेच. या दिवाळीसाठी काहीच दिवस उरल्याने बाजारपेठेत आकाश कंदील खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. गतवर्षीपेक्षा दरात थोडी वाढ झाली असली तरी आपल्या घराला शोभून दिसणारे छोटे व मोठे आकाश कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे. विविध शालेय विद्यार्थ्यांकडूनही आकाश कंदिल बनवले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.