जिल्ह्यात वाढला मतदानाचा टक्का

सरासरी 66.57 टक्के : लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान

सातारा  – लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या आठ मतदारसंघासाठी सरासरी 66.57 टक्के मतदान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर केली. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सहा विधानसभा मतदारसंघांतून 12 लाख 39 हजार 548 तर विधानसभेच्या आठ मतदारसंघातून 16 लाख 79 हजार 73 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या आकडेवारीमुळे निवडणुकीच्या निकालाबाबत तर्कवितर्क मांडले जाऊ लागले असून गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभेसाठी मतदान वाढल्याने उत्सुकता शिगेला
लोकसभेसाठी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 56 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले एक लाख 26 हजार मतांनी निवडून आले होते. मात्र, तीनच महिन्यांत उदयनराजे खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झाल्याने पुन्हा पोटनिवडणूक झाली. उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने श्रीनिवास पाटील यांनी दंड थोपटले. लोकसभेच्या रिंगणात सात उमेदवार असले तरी खरी लढत उदयनराजे व श्रीनिवास पाटील यांच्यातच आहे.

मतदानाचा टक्का पूर्वीच्या तुलनेत वाढल्याने राजकीय उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे घड्याळ की कमळ याचे उत्तर आता गुरुवारी मिळणार आहे. झालेले मतदान पुढील प्रमाणे वाई- 2,26,242 (68.26 टक्के), कोरेगाव-2,04,237 (68.36 टक्के), कराड उत्तर 1,98,778 ( 68.07टक्के), कराड दक्षिण 2,08,512 (71.44 टक्के), पाटण- 2,03,129 (67.73 टक्के), सातारा- 1,98,650 (59.06 टक्के), फलटण- 2,13,790 (64.46 टक्के), माण- 2,25,735 (66.35 टक्के) एकूण मतदान -16,79,073 (66.57 टक्के)

सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के तर विधानसभेसाठी सरासरी 66.57 टक्के मतदान झाले. सातारा जिल्हयात सर्वाधिक मतदान कराड दक्षिणमध्ये 71.44 टक्के तर सर्वात कमी मतदान सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 59.06 टक्के मतदान झाले आहे. वाई, कोरेगाव, कराड उत्तरमध्ये विधानसभा मतदारसंघात 68 टक्के मतदान झाल्याने राजकीय धाकधूक वाढली आहे. कराड दक्षिणमध्ये 67.33 टक्के, तर पाटण मतदारसंघात 67.73 टक्के मतदान झाले.

फलटण विधानसभा मतदारसंघात 64.46 तर माण विधानसभा मतदारसंघात 65.40 टक्के मतदान झाले. आठ लाख 77 हजार 826 पुरुष तर आठ लाख एक हजार 784 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा जिल्हयात एकूण 16 लाख 79 हजार 73 मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले व सरासरी 66.57 टक्के मतदानाची नोंद झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.