कराड -करोना महामारीच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगबाबत कराड पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमाद्वारे छत्री वापरा, डिस्टन्स पाळा असा संदेश त्यांनी शहरवासियांना दिला. नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मध्यांतरानंतर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरीक खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसत आहे.
यापूर्वी पोलीस प्रशासनाने लॉकडाऊन काळात कडक बंदोबस्त ठेवला होता. रसत्यांवर फिरणाऱ्यांना दंडूका व वाहनावरून फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. सर्व रस्त्यांवर बॅरिगेटस् लावून बंद करण्यात आले होते. तरीही करोनाचा कराड शहरात शिरकाव झाला. याशिवाय कराड तालुक्यातही करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. आता तर तालुक्याने शंभरी पार केली आहे.
सोशल डिस्टन्सिंग बाबत कराड पोलिसांकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. नुकताच त्यांनी छत्री वापरा, डिस्टन्स पाळा असा जनजागृतीपर अभिवन उपक्रम राबवला. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिक्षक सुरज गुरव, कराड तालुका पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचा सहभाग होता.
कराड शहर पोलीस ठाण्यापासून जनजागृतीस रॅलीस प्रारंभ झाला. दत्त चौकातून मुख्य रस्त्याने बाजारपेठ मार्गाने चावडी चौक कृष्णा नाका व पुन्हा शहर पोलीस ठाण्यापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत पोलिसांनी हातात छत्री घेऊन नागरिकांना डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले. खरेदीसाठी गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवल्यास करोना रोखू शकतो. त्यासाठी छत्रीचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनीही पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले.