वॉशिंग्टन – करोनामुळे बहुतेक साऱ्या जगाचे अर्थकारण ठप्प आहे. त्याचे एकूण जागतिक अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम होत असून सन 2008 साली आलेल्या भीषण आर्थिक मंदीलाही या आपत्तीने मागे टाकले असून त्यावेळी झालेल्या आर्थिक नुकसानीपेक्षा या आपत्तीतील नुकसान तिप्पट आहे असा निष्कर्ष याविषयीच्या अहवालातून काढण्यात आला आहे. आयएचएस मार्किट संस्थेने या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेचे आकारमान 5.5 टक्क्यांनी कमी होईल असे म्हटले आहे.
या आपत्तीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी कमी होईल तर युरो चलन वापरणाऱ्या 19 युरोपिय देशांचे अर्थकारण 8.6 टक्क्यांनी आकुंचन पावेल. या संस्थेच्या अहवालात असेही म्हटले आहे की यापुढील काळात दिवाळखोरीची लाटच येईल. लोकांना घरे चालवणे आणि जुन्या सवयीप्रमाणे खर्च करणेही यापुढील काही काळ अशक्य बनणार असून त्यामुळे अनेक क्षेत्रांचा व्यवसाय यापुढेही घाट्यातच राहणार आहे. या संस्थेचे कार्यकारी संचालक सारा जॉनसन यांनी म्हटले आहे की, अर्थकारणाचे अनेक भाग यापुढील काळात बंदच राहण्याचा धोका आहे.
डचेच बॅंकेच्या संपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापनाने म्हटले आहे की सन 2020 च्या पुढील सहा महिन्याच्या काळात अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता असली तरी झालेले नुकसान भरून काढण्याची त्यात क्षमता नसेल. 2022 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे सुधारण्याची कोणतीही लक्षणे सध्या दिसत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.