ठळक नोंदी…
-तासवडे येथे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा
-नवीन कृष्णा पूल वाहतुकीसाठी बंद
-दत्त चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पाण्याचा विळखा
-शाहू चौकात पाणी आल्याने रस्ता बंद
-कोयना दूध कॉलनीत पुराचे पाणी
-पाटण कॉलनीतील झोपड्या पाण्याखाली
-यशवंत हायस्कूल समोरील मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी
-प्रीतिसंगमावर बालाजी मंदिरापाशी आले पाणी
-जुना कोयना पूल वाहतुकीसाठी बंद
-पाटण तीकाटण्यात पुराच्या पाण्याचा वेढा
-आटके, विंग, गावाला महापुराचा फटका
कराड – मुसळधार पावसाने कराडसह पाटण तालुक्यात महापूर आल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. दोन्ही तालुक्यातील घरांमध्ये पुराचे पाणी जात असल्यामुळे दोन हजारांवर लोकांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. पाण्याची पातळी वाढतच असल्याने पुणे-बेंगलोर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने नवीन कृष्णा पूल दुपारी बाराच्या सुमारास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तो फक्त पादचाऱ्यांसाठी खुला ठेवला असून पावसामुळे जीर्ण झालेल्या घरांची पडझड होत आहे.
दिवसेंदिवस पावसाचा हाहाकार सुरू असून कराड व पाटणला महापुराने गाठले आहे. शहरात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून जुना कोयना पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथील शाहू चौकामध्ये तसेच कोयना दूध कॉलनीत पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले असल्याने हा रस्ता बंद झाला आहे. दत्त चौकातही दुपारनंतर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. पाटण कॉलनी येथे पुराचा तडाखा बसला असून तेथील बऱ्याच झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. तेथील पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक धिम्या गतीने सुरू ठेवण्यात आली आहे. यशवंत हायस्कूलच्या पाठीमागील बाजूने पुराचे पाणी मुख्य रस्त्याकडे येऊ लागले आहे. कोयनेश्वर मंदिर याआधीच पाण्याखाली गेले असून पायऱ्या खालच्या परिसरात पाणी आले आहे. शुक्रवार पेठेतील नदीकाठावरील काही घरे पाण्याखाली गेली आहेत.
प्रीतिसंगमावरील नदीपात्र हळूहळू मोठे होऊन दुपारी 1 पर्यंत हे पाणी बालाजी मंदिरापर्यंत आले होते. तेथून जवळच असलेल्या गणपती बनवणारे शेड पाण्यात बुडल्याने गणेश मूर्तीचे नुकसान झाले आहे. मंगळवार पेठेतील स्मशान भूमीतही पुराचे पाणी गेले आहे. शहरातील नदीकडील मुख्य रस्त्याच्या पूर्वेला असणाऱ्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले आहे. पाणी उपसण्याची मोटारीने पाणी बाहेर काढले जात आहे. नवा कृष्णा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. येथे फक्त पादचारी लोकांसाठी हा खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीपात्रातील पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून पुलाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कराड तालुक्यातील विंग येथेही पावसाने दैना उडवून दिली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून विभागात वांग नदीला आलेल्या पूरामुळे तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तांबव्यातील कोयना नदीवरील पूल रविवारीच पाण्याखाली गेल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. आज दिवसभर पावसाचे व पुराचे पाणी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर घुसले आहे. त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांच्या साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हे पाणी रेठरे बुद्रुक मध्ये शिरले आहे. त्यामुळे गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. येथील बरीच घरे पाण्यात गेली असून जनजीवन ठप्प झाले आहे.
येरवळे जुने गावठाणात बौध्द वस्तीत पाणी घुसल्याने अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तेथील कुंटूबे जवळच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत केली आहे. तेथील ग्रामदैवत हनुमान मंदीर व स्मशानभूमी पाण्यात आहे. तेथे स्ट्रीट लाईट कोलमडली आहे. पाणीपातळीत वाढ सुरूच असून नदीकाठची अनेक कुंटुबे भीतीच्या छायाखाली आली आहेत. पोतले दलीत वस्तीत व चचेगांव जुने गावठाणात पाणी घुसले आहे. ठिकठिकाणी शेती पाण्याखाली असून अनेकांनी पाळीव जनावरे नातेवाईकाकडे स्थलांतरीत केली आहे.
कराड परिसरातील गावातील नदीकाठच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. शिंदेवाडीत जमिन उफाळल्याने ठिकठिकाणी त्याचा उन्माळा घराघरात निघाला आहे. घरातून पाणी वाहताना दिसत आहे. पावसाने कराड तालुक्यातील दगड-मातीच्या घरांना धोका असून ठिकठिकाणी भिंतीची पडझड अद्याप सुरूच आहे. पोतले जुने गावठाणातही वांग नदीचे पाणी घुसले असून ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुरस्थितीचा फटका तालुक्यातील तासवडे टोलनाका येथे ही बसला आहे.
आज सकाळी कोल्हापूरहून साताऱ्याला जाणाऱ्या महामार्गावरची वहातूक तळबीड पोलिसांनी काही काळ बंद केली होती. परिसरातील महामार्गावरील वाहतूक कमी झाल्याने तासवडे टोलनाका परिसरात महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. तासवडे टोलनाक्यावर वाहनांच्या दोन किलोमीटरवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे याठिकाणची वहातूक काही काळ चालू तर काही काळ बंद ठेवून वहातूक सुरळीत करुन गर्दी नियंत्रित करण्यात येत होती. कराड तालुक्यातील बरेच पूल पाण्याखाली गेल्याने एसटी व खासगी प्रवासी वाहतूक बंद झाली आहे.