कराड -करोना महामारीच्या काळात कर वसुलीला बसलेला ब्रेक कराड पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. नगरपालिकेची 15 कोटी रूपयांची थकबाकी असून केवळ साडेतीन कोटी रूपयांची कर वसुली झाली आहे. यामुळे पालिका आर्थिक संकटात सापडली आहे. वसूली विभागाकडे आता केवळ चार महिन्याचा कालवधी वसुलीसाठी उरल्याने भविष्यातील आर्थिक नियोजन करताना पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे.
नगरपालिका दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये वसूलीस प्रारंभ करत असते. मार्च अखेरीपर्यंत पालिकेला 100 टक्के वसूली पूर्ण करावी लागते. दरवर्षी पालिका करवसूलीचे उद्दिष्ठ गाठत असते. मात्र यंदा करोना महामारी व लॉकडाऊनमुळे कर वसुली करण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे 18 कोटी रूपयांच्या करवसुली पैकी केवळ साडेतीन कोटी रूपयांची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे पालिकेचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे. करवसूली न झाल्यास पालिकेला मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागणार आहे.
तब्बल 15 कोटी रूपयांची वसुली करणे पालिकेच्या कर वसुली विभागापुढे मोठे आव्हान ठरत आहे. करवसुली विभागाचा अधिकारी, कर्मचारी यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काही थकबाकीदारांची गत वर्षासहित यंदाचीही थकबाकी राहिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्वरीत आपला कर भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.