महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावरील तरुण तडफदार, कर्तबगार, विकासाभिमुख, आदरणीय आमदार संग्रामदादा अनंतराव थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघात 2009, 2014 आणि 2019 या कार्यकाळात विजयाची हॅटट्रिक साधली आहे. आपल्या कार्यतत्पर व्यक्तीमत्वामुळे त्यांनी राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक मोठ्या मतदारसंघात सर्व घटकांशी सामाजिक बांधिलकीची नाळ जोडली आहे.
आज तीन तालुक्यांतील प्रत्येक गावागावांत विकासाभिुख चेहरा म्हणून ते परिचित आहेत. राजकीय स्थिती दोलायमान असताना भोरच्या राजकीय पटलावर दादांनी भक्कमपणे पाय रोवले आहेत. भोरच्या जनतेने त्यांना कायम साथ दिली आहे. भोरचे हे अढळ नेतृत्व सर्वांपेक्षा लक्षवेधी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शब्दबद्ध प्रतिक्रिया…
आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या यशामध्ये मा. लोकनेते अनंतराव थोपटे साहेबांचा आशीर्वाद व मार्गदर्शन निश्चितच मोलाचे आहे. प्रथमच 1972 मध्ये अनंतराव थोपटे यांनी ज्या प्रचंड उत्साहामध्ये विधानसभेची निवडणूक जिंकली. आदरणीय अनंतराव थोपटे साहेब यांच्या विचारांचा वारसा दादांनी तळागाळापर्यंत पोहोचविला आहे. दादांच्या आमदारकीच्या हॅटट्रिकमुळे दादा सर्वसामान्यांचे लोकाभिमुख मॉडेल म्हणून परिचित झाले आहेत.
विधानसभेच्या एकाच मतदारसंघात तीन तालुके असणारा राज्यातील हा एकमेव भोर मतदारसंघ आहे. 284 किलोमीटरचा परीघ, असे अवाढव्य त्याचे क्षेत्रफळ आहे. भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. मात्र, प्रतिकूल भौगोलिकदृष्ट्या कार्यक्षेत्रात दादांनी विकासकामाचा डोंगर उभा केला आहे. मुळशी तालुक्यासाठी सर्वाधिक निधी मिळवून लोकांशी संपर्क ठेवला आहे. त्यातूनच त्यांनी विविध विकासकामे केली आहेत. दादांच्या पाठपुराव्याने महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय राज्यामध्ये झाले आहेत.
याकरिता दादांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. भाटघर, वीर व मुळशी धरण प्रकल्पातील मूळ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना दादांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 125 वर्षांनी न्याय मिळाला आहे. मूळ प्रकल्पग्रस्तांच्या खापरपणतुस प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळाला, हे मोठ्या अभिमानाने आजही लोक सांगतात.
संग्रामदादांनी विकासकामांबरोबरच विधानसभेमध्ये ठसा उमटविला आहे. फक्त मतदारसंघातील प्रश्नांबरोबर त्यांनी विधानसभेत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न प्रश्न, जिल्ह्यातील 79 गावांतील दूषित पाणीपुरवठा, खाद्यपदार्थातील भेसळ, मुलींसाठी शौचालय आदी विषयांवर त्यांनी विधानसभेत आवाज उठविला आहे. क्रीडा क्षेत्राविषयी दादांना विशेष प्रेम आहे.
अनंत स्पोर्टस फाउंडेशनचे ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. कुस्ती, कबड्डी, फुटबॉल या खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून ते विविध स्पर्धांचे आयोजन आजही करतात. कुस्तीविषयी त्यांना पहिल्यापासून प्रेम आहे. भोर तालुका कुस्ती संघटनचे संस्थापक-अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. बालेवाडी क्रीडानगरीमधील अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. भोर – वेल्हा – मुळशी तालुक्यातील वधू व वर पित्यांचा लग्नावरील खर्च वाचावा, यासाठी संग्रामदादांनी पुढाकार घेऊन सामुदायिक विवाहाची मुहुर्तमेढ रोवली.
दि. 6 मे 2006 पासून दरवर्षी अनंतराव थोपटे गौरव समितीतर्फे व विश्वचैतन्य प. पू. नारायणमहाराज यांच्या आशीर्वादाने व मा. अनंतराव थोपटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी बिगर हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन ते करीत आहेत. आतापर्यत 700 पेक्षा अधिक जोडपी सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या खर्चांची बचत झाली असून त्यांनी समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्राच्या डोंगरी भागामध्ये अग्रगण्य असलेल्या राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेमार्फत व रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेमार्फत दादांनी शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
भोर-वेल्हा – मुळशीतील सर्व युवकांना शिकण्यासाठी सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी दादा आग्रही आहेत. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना शिकता आले नाही तर दादा त्यावर मार्ग काढून त्याला शिक्षणाच्या प्रवाहात अग्रगणी ठेवतात. आदरणीय अनंतराव थोपटे साहेब यांनी रूजविलेल्या शैक्षणिक क्रांतीचा वारसा दादा जोपासत आहेत. लोकनेते मा. अनंतराव थोपटे साहेबांनी दाखविलेला मार्ग, मातोश्री स्व. निर्मलाताई थोपटे यांचा आशीर्वाद, सौ. स्वरूपा तसेच भगिनी डॉ. सौ. भाग्यश्री पाटील यांची साथ आहे. त्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर संग्रामदादा यशस्वी वाटचाल करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
शब्दांकन -भुजंगराव दाभाडे,
तालुका प्रतिनिधी, भोर