सातारा- कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या सात संशयित रुग्णांपैकी ६४ वर्षीय पुरुष करोना (कोव्हीड -१९) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित ६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील करोना बाधित निकट सहवासातील ९ जणांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे पुण्यातील एन.आय.व्ही.ने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
काल ६ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-१९ बाधित रुग्णाच्या सहवासातील चौदा जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे २ रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या एकूण १६ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही.कडे पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला २५ वर्षीय संशयित अत्यवस्थ झाल्याने रात्री एकच्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.