शिरूरच्या डॉ. पोटे यांनी वेळेवर केले उपचार
शिरूर – प्रसूती वेदना होत असताना लॉकडाऊनमुळे कुठेच उपचार मिळत नसताना शिरूर येथील नर्सिंग होमच्या डॉ. संतोष पोटे, डॉ. सुनीता पोटे यांनी या गरोदर महिलेची प्रसूती करून माणुसकी जपली. महिला आणि तिथे बाळ दोन्ही सुखरूप आहे.
सध्या करोनाचा संसर्ग वाढला असून नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे. ही भीती ग्रामीण भागात काम करणाऱ्या व सेवा देणाऱ्या हॉस्पिटल डॉक्टरमध्येही आहे. कारण या आजाराबद्दल कुठलेही किट बाजारात उपलब्ध नाही. यामुळे आलेला रुग्ण नक्की कोणत्या आजारात आहे, हे शोधणेही कठीण झाले आहे.
एखादा रुग्ण करोना व्हायरस पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यावर उपचार केले गेले तर या आजाराची लागण डॉक्टरांबरोबर तेथे काम करणाऱ्या नर्सेस, ब्रदर्स व इतर कर्मचाऱ्यांना होऊ शकते. त्यामुळे सध्या खासगी डॉक्टरही ताक फुंकून पित आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. शिरूर येथील मीरा नर्सिंग होमचे डॉ. संतोष पोटे आणि डॉ. सुनिता पोटे या दोघांनी अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम सुरू केले आहे. त्यात शिरूर शहरातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असताना त्यांनी शिरूर येथील मीरा नर्सिंग होमशी संपर्क साधला. या महिलेची प्रसूती सुखरूप झाली. डॉ. संतोष पोटे एक देवदूताप्रमाणे त्या कुटुंबांच्या हाकेला धावून आले आहे.