हिंदुस्थानचे एडिसन असे ज्यांना संबोधिले जायचे त्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांनी सुमारे दोनशेच्यावर शोध लावले, तर त्यांच्या नावे चाळीस पेटंट आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे 29 एप्रिल 1867 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण कल्याण, जळगाव, धुळे व पुणे येथे झाले.
वर्ष 1893 मध्ये त्यांनी शास्त्रीयज्ञानाचा प्रसार करण्यासाठी “द सायंटिफिक क्लब’ची स्थापना केली. याच संस्थेमार्फत त्यांनी वर्ष 1894 मध्ये “विविध कलासंग्रह’ हे मासिक सुरू केले. यानंतर 1900 मध्ये त्यांनी मुद्रणव्यवसायातील यंत्रसामग्रीचा अभ्यास सुरू केला व लायनो, मोनो इ. यंत्रांच्या रचना व कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी “भिसे टाइप’ या यंत्राचा शोध लावला व त्याचे युरोपीय देश व अमेरिकेमध्ये एकस्व (पेटंट) प्राप्त केले. या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतन टाटा यांच्या भागिदारीमध्ये “द टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे वर्ष 1910 मध्ये स्थापना केली, पण 1915 मध्ये ती बंद पडली.
मुद्रण या व्यवसायावर पाश्चिमात्य देशांचे प्रभुत्व होते, पण भिसे यांच्या चिकाटी व अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी या क्षेत्रात पाश्चात्यांची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनी “गुणित मातृका’ नावाचे दर मिनिटास सुमारे 1 हजार 200 विविध प्रकारचे छपाईचे खिळे पाडणारे हे यंत्र आणि वर्ष 1914 मध्ये तयार केले व ते वर्ष 1916 मध्ये विक्रीसही आणले. त्याच वर्षी ते अमेरिकेस गेले व तेथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशिन या कंपनीच्या विनंतीनुसार आयडियल टाइप कास्टर हे यंत्र शोधून काढले व त्याचे पेटंट मिळविले आणि भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करून यंत्राचे उत्पादन सुरू करून वर्ष 1921 मध्ये पहिले यंत्र विक्रीस आणले. वर्ष 1917 मध्ये त्यांनी “शेला’ या नावाने कपडे धुण्यासाठी वापरता येईल अशी डिटर्जंट पावडर तयार केली व त्याचे निर्मितीचे हक्क एका ब्रिटिश कंपनीला दिले.
1910 मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातील एक भारतीय औषध फार गुणकारी ठरले. त्याचा गुणकारीपणा आयोडिनमुळे आहे हे त्यांचे लक्षात आले व त्यावर संशोधन करून वर्ष 1914 मध्ये बेसलीन या नावाने स्वतःच एक नवीन औषध बनविले. हे औषध उपयुक्त ठरल्याने पहिल्या महायुद्धात त्याचा अमेरिकन लष्कराने मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यावर आणखी संशोधन करून आयोडीन घटक असलेले पोटात घेता येईल असे एक औषधही त्यांनी विकसित केले व त्याच्या निर्मितीसाठी वर्ष 1923 मध्ये न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. पुढे वर्ष 1927 मध्ये त्याचे उत्पादन व वितरण यांचे हक्क त्यांनी शेफलीन कंपनीला विकले. “अमेरिकन हूज हू’मध्ये समाविष्ट झालेले ते पहिलेच भारतीय होत. 7 एप्रिल 1935 रोजी त्यांचे हृदयविकाराने न्यूयॉर्क येथे निधन झाले.
विविधा : माधव विद्वांस