पुणे – मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कात्रज कोंढवा भागाचे प्रतिनिधित्व करणारे वसंत मोरे हे मनसेचे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगा रुपेश मोरे याला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले आहे.
वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आता वसंत मोरे यांच्या मुलाला धमकावल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला व्हॉट्सअप मेसेज करून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ या आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या आरोपीने कुणाच्या सांगण्यावरून ही धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कानून के हाथ बहुत लंबे होते है ! धन्यवाद… भारती विद्यापीठ पोलीस’ असं वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.