पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सात दिवसांत तब्बल 1 लाख 36 हजार बालकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी झालेली आहे. आगामी कालावधीत आणखी अर्ज नोंदणी होणार असून यंदा अर्ज नोंदणीचा उच्चांक गाठला जाण्याचीच अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी “आरटीई’ प्रवेशासाठी 8 हजार 828 शाळांनी नोंदणी केली असून 1 लाख 1 हजार 969 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 1 मार्च पासून “आरटीई’ पोर्टलवर बालकांच्या पालकांना ऑनलाइन प्रवेश भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 17 मार्चपर्यंत अर्ज नोंदणीसाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात 936 शाळांमध्ये 15 हजार 655 एवढा प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत.
या जागांसाठी राज्यात सर्वाधिक 31 हजार 207 अर्जांची नोंदणी झालेली आहे. ठाणे- 12,296, नागपूर-15,710, नाशिक-8,383, मुंबई-7,573, छत्रपती संभाजीनगर- 6,996, जळगाव-4,105, नांदेड- 3,875, रायगड-4,585, नगर-3,471 याप्रमाणे प्रवेशासाठी अर्ज नोंदणी झालेली आहे.