कान्हे – गेली सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या मागणीसाठी कान्हेगावच्या उपसरपंच सोनाली सातकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आला आहे. तर काही उपोषणकर्त्यांनी मुंडन करत राज्य सरकारचा निषेध केला आहे.
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज व पंचक्रोशीतील नागरिकांनी कान्हे फाटा येथे लक्षणीय एक दिवसीय उपोषण करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कान्हेगावच्या उपसरपंच सोनाली सातकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला; तर काही उपोषणकर्त्यांनी मुंडन करत, राज्य सरकारचा निषेध केला.
लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील 38 गावांमधील सकल मराठा समाजाने कार्ला येथे साखळी उपोषण केले. त्यानंतर भाऊसाहेब हुलावळे, कैलास पडवळ, संदिप तिकोणे, प्रकाश शिंदे या चार जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. याशिवाय सोमवारी (दि.30) सकाळी समीर हुलावळे, अनिल हुलावळे, गणेश वायकर, सतीश मोरे, योगेश हुलावळे, गणेश हुलावळे, संकेत भानुसघरे या युवकांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले होते. परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
कार्ला तलावात मराठा तरुणांनी आंदोलन सुरु केले तेव्हा एकच मिशन मराठा आरक्षण “थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणला. तर या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित होते.
राजकीय नेत्याला प्रवेश बंदीचे फलक
या उपोषणाला पंचक्रोशीतील कान्हे, ब्राह्मणवाडी, जांभुळगाव, साते मोहितेवाडी, पारवडी, साई ,आहिरवडे, नानोली, नायगाव, येवलेवाडी येथील नागरिकांनी पाठिंबा दर्शवला होता. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्याला प्रवेश करू देणार नाही असे फलक लावण्यात आले आहेत.