राहाता – राहात्यात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसवर असणाऱ्या शासकीय जाहिरात फलकावरील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर नेत्यांच्या चेहऱ्याला काळे फासत जोडे मारले.
सरकारचा निषेध नोंदवत मराठा आरक्षण प्रश्नी लवकर निकाल द्या व जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी घ्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे केले जाईल. भविष्यातील आंदोलन सरकारला झेपणार नाही. मराठा समाज बांधव सरकारची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला.
सकाळी राहाता शहरातील व तालुक्यातील अनेक समाज बांधव ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरासमोर एकत्रित जमा झाले. त्यानंतर पायी बस स्थानककडे चालत गेले. एसटीला थांबवत प्रत्येक एसटीवरील नेत्यांच्या तोंडाला काळे पासून त्या फ्लेक्सवर जोडे मारले.”एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, असं म्हणत परिसर दणाणून सोडला.
शहरातील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन बंद शंभर टक्के यशस्वी केला. दरम्यान, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसला थांबवून नेत्यांच्या फोटोला काळे फासले व जोडे मारले. यावेळी बसमधील प्रवाशांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शांततेत आंदोलन सुरू असल्याने त्याची झळ बसली नाही.