मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच 11 फेब्रुवारी 2022 रोजी वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केलं आहे.
या चित्रपटात दीपिकाचे सिद्धांतसोबत अनेक किसिंग सीन असून, या दोघांची बोल्ड केमेस्ट्री दिसत आहे. ‘गहराइयां’ हा चित्रपट एक रिलेशनशिप ड्रामा असून, तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं चित्रपटात पाहायला मिळतं. दरम्यान, चित्रपटात दाखवण्यात आलेला दीपिका आणि सिंद्धांत यांचा एक किसींग सीन सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता दीपिकावर टीकाही होत आहे.
बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत हिने या चित्रपटातील बोल्ड सीनवर आपली प्रतिक्रिया दिली असून, कंगनाने अप्रत्यक्षरित्या प्रसिद्ध निर्माता करण जौहरवर टीका केली आहे. कंगना ही करण जौहरच्या अनेक चित्रपटांवर टीका करण्याची एक संधी सोडत नाहीत. आणि अशीच एक संधी आता सुद्धा कगणांना मिळाली असून, तिने पुन्हा एकदा करण जौहरवर निशाणा साधला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने करण जौहरचे नाव न घेता दीपिकाच्या चित्रपटाला अश्लील चित्रपट असे म्हटले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने मनोज कुमार यांच्या ‘हिमालय की लाड में’ या चित्रपटातील ‘चांद सी मेहबूबा’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
याला कॅप्शन देताना कंगनाने म्हटले की, “मी सुद्धा या वयाची आहे. मलाही रोमान्सही समजतो. नवीन युग आणि शहरीकरणाच्या चित्रपटाच्या नावाखाली कृपया असला कचरा विकू नका. वाईट चित्रपट हा वाईटच असतो. कोणताही स्किन शो किंवा पो#ग्राफी त्याला वाचवू शकत नाही. हे एक मूलभूत सत्य आहे, त्यात ‘गहराइयां’ असण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.” अशी जोरदार टीका कंगनाने आपल्या पोस्ट मधून केली आहे.