वॉशिंग्टन: मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकेतील लोकप्रिय संसद सदस्य कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्या कडवे आव्हान देऊ शकतात. त्यामुळे ट्रम्प यांची डोकेदुखी वाढली असल्याचे मानले जात आहे. सातत्याने कार्यप्रवण राहण्याचा वारसा हॅरिस यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाला आहे.
आपल्या संकल्पना मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग असल्याचे हॅरिस नेहमीच सांगतात. असे असूनही त्या लोकांचे जास्त लक्ष वेधून घेऊ शकलेल्या नाहीत. जर मतदार स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाची अपेक्षा करत असतील तर त्यांचा अजेंडा अस्पष्ट व आश्वासक नाही असे डेमोक्रॅटिक समर्थक विचार करतात. जानेवारीत जोरदार सुरुवात केल्यावर हॅरिस यांची मोहीम थंडावली होती. परंतु उमेदवारीच्या स्पर्धेत त्या आहेत.
राष्ट्रीय व राज्याच्या सर्वेक्षणात त्यांची लोकप्रियता पाच ते सहा अंकांच्या दरम्यान आहे. आरोग्यसेवा, स्थलांतर या महक्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. त्यांच्या बहुतांश भाषणांमध्ये एकतेवर भर असतो असे मानले जाते. त्यामुळे नजिकच्या भविष्यात आपल्या ध्येय-धोरणांची फेर आखणी करुन हॅरिस यांना लोकांची मने जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी लागणार आहे, असे राजकीय निरीक्षक मानतात.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या पाच प्रबळ दावेदारांमध्ये हॅरिस यांच्या मानांकनात सातत्य आहे. त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत 82 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा केला होता. मतदारांच्या बदलत्या दृष्टिकोनाचा त्यांना फायदा मिळू शकतो. नशिबाने साथ दिली तर त्या उमेदवारही बनू शकतात आणि आक्रमक प्रचार ठेवल्यास निवडूनही येऊ शकतात. दुसरीकडे पक्षाच्या अनेक बड्या दावेदारांमध्ये नरमाई दिसत आहे. माजी उपराष्ट्राध्यच बायडन सगळ्यात पुढे आहेत, पण राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील खुल्या चर्चेतील खराब कामगिरीमुळे त्यांचे नाव मागे पडू शकते.