काल प्राध्यापकांना फोन केला, लगेचच ते म्हणाले की, बरेच दिवस तुम्ही फोन केला नाही, अर्थात मीही केला नाही. मग काय सध्या दुसरा विषय नाही. लॉकडाऊनवर चर्चा सुरू होती. काही ठिकाणी ते कमी करण्याचे ठरत आहे, असे चित्र दिसते. सर म्हणत होते की पोलीस खाते, डॉक्टर्स, वैद्यकीय साहाय्यक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या कार्याला तोड नाही. लोकांनाही बऱ्या प्रकारे समज आलेली दिसते.
पोलीस खातेही वेगवेगळ्या युक्त्या वापरून लोकांच्या मनात लॉकडाऊन चांगले बिंबवत आहे व कारणही स्पष्ट करीत आहे. मागे एक पोलीस अधिकारी स्पीकरवरून गाणे म्हणतानाही दाखवला होता. मग वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा जागेवर देण्याचे प्रकारही दाखवले गेले. रुग्णवाहिका आणून त्यातही टाकून दाखवण्याचे प्रकार झाले जेणेकरून लोकांना भीती बसावी. पोलिसांना हेच दाखवून द्यायचे आहे की नक्की कशा प्रकारे प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी तसेच घरच्यांना व इतरांनाही कशी काळजी घ्यायला लावावी.
मग मी त्यांना आमच्या कडील उदाहरण सांगितले. एक पोलिसांची गाडी आली जी मागून ओपन होती. चालवणारा सोडून मागे एक पोलीस कीर्तनकाराच्या भूमिकेत व योग्य अंतर ठेवून एक पेटीवाला व तबलावाला होता. आधी सगळ्या लोकांना आवाहन करून प्राथमिक माहिती दिली होती. लोकांनी लॉकडाऊनमध्ये काय करावे, काय करू नये हे समजावून सांगितले गेले.आपल्या देशावर आलेले मोठे संकट असून सर्वांनी सहकार्य करून एकत्रितपणे त्याचा मुकाबला केल्यास लवकरात लवकर आपण यातून मुक्त होऊ असा आशावादही दिला. मग सरांना म्हणालो, पण मला सर्वात काय आवडले तर त्यांनी जे नंतर गाणे म्हणून दाखवले जे आपल्या भक्तिगीतवर केले होते. मूळ गाण्यात असे आहे,
वेदांनाही नाही कळला
अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा… या गाण्यावर त्यांनी गायले…
विज्ञानाही नाही कळला
अंतपार याचा
विषाणू चिनी बनावटीचा
विषाणू चिनी बनावटीचा
गोलाकार तो काटेरीश्वर
जसा उगवाला उभा यमेश्वर
सज्ज ठेविले काटे गोलावर
पुतळा बकासुराचा
विषाणू चिनी बनावटीचा
ब्रह्मास्त्र हे जगा मारी…
मुके ठाकले जग गिळण्यासी
उभा राहिला आसूर खरा
जणू तो क्रूर काळाचा…
विषाणू चिनी बनावटीचा
हा युरोपाची वाट लावतो
अमेरिकेचे होश उडवितो
चिनीधरांचा हा परमात्मा
धोका भारतमाता…
विषाणू चिनी बनावटीचा
विज्ञानाही नाही कळला
अंतपार याचा
विषाणू चिनी बनावटीचा
विषाणू चिनी बनावटीचा
– उत्तम पिंगळे