वाघोली – अध्यात्मिक संस्काराचा नवनाथ काकडे यांनी राबवलेला अभिनव उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेवराव चव्हाण यांनी केले. श्री क्षेत्र थेऊर तालुका हवेली येथे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी नामदेवराव चव्हाण यांनी सांगितले की कीर्तन प्रवचन आणि अध्यात्मिक कथा याचे सुसंस्कार नागरिकांच्या मनावर प्रभाव करत असतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन अध्यात्माला “डिजिटल प्लॅटफॉर्म” मिळाल्याने जनमानसाचा सहभाग वाढून त्यातून एक रचनात्मक पिढी तयार होण्यासाठी मोलाची मदत होत आहे.
श्रीक्षेत्र थेऊर येथील ग्रामदैवत महातारीमाता मंदिर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ, आमदार राहुल कुल, पुणे शहराचे पोलीस उपायुक्त राजा रामासामी, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, उद्योजिका भाग्यश्री प्रसादराव पाटील,गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजीअध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त बन्सीधर देसाई, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड, राहुलकुमार येवले आदी उपस्थित होते.
हभप किरण महाराज भागवत, कु. अर्चनादीदी साळुंखे आनंद महाराज तांबे, रणजित महाराज शिंदे, राधाकृष्ण महाराज अकोलकर, विष्णू महाराज आनंदे, रेश्माताई विनोद काकडे महाराज यांची कीर्तनसेवा तसेच श्रीराम महाराज पाटील, एकनाथ महाराज सांगोलकर यांच्या कथा अभ्यासू श्रोत्यांसाठी श्रवनीय ठरल्या.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार बिग बॉस फेम ह.भ.प.कु. शिवलीला बाळासाहेब पाटील यांचे प्रभावी कीर्तन या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणून चर्चेत आले.
समाजप्रबोधनकार व भागवतचार्य ह.भ.प. श्री समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याच्या अभ्यासू कीर्तनाने सांगता झाली. या प्रसंगी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनीही उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला यावेळी त्यांनी महातारीमातेच्या नवरात्र उत्सवाचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा असे पाटील यांनी आवाहन केले. नवरात्र उत्सवामध्ये या वर्षी वेगळे उपक्रम आणि नेहमीचा पूर्ण वेळ महाप्रसाद यामुळे भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेता पोलीस विभागाने स्वतंत्र वायरलेस सेवा आणि विशेष पोलीस बंदोबस्ताची खबरदारी घेतली होती. अभिनव उपक्रमातून नेहमीच चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष आणि उत्सवाचे संयोजक नवनाथ काकडे यांचे अधिकारी,पदाधिकारी व नागरिक यांच्याकडून कौतुक होत आहे.