वाघोली : मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देऊन उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे वाघोलीतही उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी वाघोलीतही साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते.
उपोषणादरम्यान वाघोली परिसरातील नागरिक व संघटनांनी पाठींबा दिला होता. दरम्यान वाघोलीतील मराठा बांधवांच्यावतीने कॅंडल मार्च काढण्यात आला होता. ३१ तारखेपासून साखळी उपोषणानंतर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.
सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतल्यानंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ देऊन उपोषण मागे घेण्यात आले असल्याने वाघोलीत सुरु असलेले उपोषण शुक्रवारी (दि.३) मागे घेण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील भुमिकेनंतर पुन्हा एकदा उपोषण सुरु केले जाणार असल्याचे वाघोलीतील सकल मराठा बांधवांनी सांगितले. ज्योती संतोष सातव योगेश दिलिप बर्डे, गणेश दामोदर पवार यांनी आमरण सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित केले आहे.
“वाघोली मधील साखळी उपोषणाला विविध सामाजिक संघटनांचा तसेच सकल मराठा समाजाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर लाभला. वाघोली मधील ज्योती संतोष सातव, योगेश दिलिप बर्डे, गणेश दामोदर पवार यांनी आमरण उपोषण करून मराठा आरक्षणाविषयी तळमळ व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात वाघोलीकरांचा संघर्ष अभिमानास्पद आहे.” – जयश्री राजेंद्र सातव पाटील माजी सरपंच, वाघोली