वाघोली : तालुका हवेली येथील बाजार तळ मैदानावर 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आंबा महोत्सव हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. थेट उत्पादक ते थेट ग्राहकापर्यंत कोकणातील हापूस आंबा माफक दरात पोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सव हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन या उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी केले आहे.
याबाबतीत रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले की, थेट उत्पादकापासून थेट ग्राहकापर्यंत आंबा महोत्सव तसेच तृणधान्य महोत्सव आयोजित केला असून या माध्यमातून पहिल्यांदाच आंब्या बरोबर तृणधान्याचा आस्वाद माफक दरात नागरिकांना घेता येणार आहे.
याबाबतीत महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्यास संबंधित प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य झाल्याने वाघोली थेट उत्पादकांकडून थेट ग्राहकापर्यंत माफक दरात आंबा व तृणधान्य पोहोचवण्याचा संकल्प पूर्णत्वास येत आहे. याचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सातव यांनी केले आहे.