Nitin Gadkari Loksabha Election 2024| केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांना भाजपकडून पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रचारासाठी त्यांनी मैदानात उतरून तयारी सुरू केली आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकारींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात आला आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीत नागपूरमध्ये गडकरी यांना नागपूरच्याच गडाचे तिकीट मिळाले आहे. यानिमित्त अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. अशातच नितीन गडकरी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जोरदार तयारी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी गडकारींनी स्वत: मैदानात उतरून आपला प्रचाराचा नारळ फोडला आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ अशा आशयाचा मजकूर असलेल्या स्प्रे पेंटिंगचे अनावरण गडकरी यांनी केले आहे.
बिनविरोध निवडणुकीची मागणी
गडकरी यांच्या कार्यामुळे त्यांची प्रतिमा देशभरात उंचावली आहे. अशातच त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यास विरोधी पक्षात अद्याप कोणीही फार इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी देखील नागपूरकरांनी केली आहे. या मागणीसाठी नागपूरकर रस्त्यावर उतरून मोहीम राबवत आहेत.
या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य चौकात हातात ‘नागपूरची शान असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड का नाही,’ असा आशय असलेला बॅनर घेत आपली भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतर राजकीय पक्षांनीही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती देखील नागपूरकरांनी या मोहिमेतून केली आहे.
हेही वाचा:
पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार?