नगर – नगरच्या के. के. रेंज या लष्कराच्या जागेचा विषय सध्या सुरु आहे. मात्र जागा आरक्षित करण्याबाबत कोणताही प्रस्ताव लष्कराकडून येथील प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. भविष्यामध्ये आरक्षणाचा विषय आल्यानंतर त्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत एकत्रित चर्चा करून विषय हाती घेतला जाईल.अद्याप पर्यंत आरक्षणाचा प्रस्ताव नसल्याचेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील के.के.रेंजमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींसंदर्भात राज्यमंत्री तनपुरे यांनी आज दि.3 जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आरर्मर्ड कॉर्पस सेंटर अँड स्कूलचे लेफ्टनंट कर्नल रोहित वाधवान, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यावेळी उपस्थित होते.
लेफ्टनंट कर्नल रोहित वाधवान यांनी, रेंज एक व दोनमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनीविषयीची माहिती बैठकीदरम्यान राज्यमंत्री तनपुरे यांना दिली. तसेच नगर, पारनेर व राहुरी तालुक्यातील फायरींग रेंजसाठी उपयोगात आणण्यात येणाऱ्या जमिनींची माहिती दिली आणि आवश्यक वाढीव जमिनींचा तपशील अवलोकनार्थ सादर केला.
तनपुरे यांनी, या भागातील शेतकऱ्यांनी यापूर्वी मुळा धरण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व के.के.रेंजसाठी जमीनी दिल्या असून फायरींग रेंज विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीसंदर्भात ग्रामस्थांमध्ये संभ्रम असल्याने, त्यासंदर्भात तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विस्थापितांची काळजी घेतानाच, सर्वांना विश्वासात घेऊन याप्रकरणी निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. जमीन मागणीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव लष्कराकडून जिल्हा प्रशासनास सादर झालेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
बैठकीला नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, पारनेर-श्रीगोंद्याचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, भूसंपादन उपजिल्हाधिकारी सी.एल.देशमुख, विशेष भूसंपादन अधिकारी अजय मोरे, ढवळपुरीचे सरपंच डॉ.राजेश भनगडे आणि संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.