नेवासा प्रतिनिधी – छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक आणि आंबेडकर चौकात रविवार (दि.३) रोजी सकाळी १० वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक पोलीसांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे महामार्गावर वाहनधारकांना तीन तास वाहतुक कोंडीचा सामना करण्याची दुर्देवी वेळ वारंवार येत असल्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे
वारंवार होणाऱ्या या वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांसह व्यावसायिकांतून वाहतुक पोलीसांच्या भूमिकेबाबत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे वारंवार होणाऱ्या या समस्येकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालून महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरीकांतून केली जात आहे.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक आणि आंबेडकर चौकात दररोज दिवसातून अनेकदा वाहतुक ठप्प होण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झालेली असून वाहतुक नियंञणाकडे महामार्ग पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले असतांनाच या महामार्गावर येथील व्यावसायिकांनी थेट रस्त्यावरच अतिक्रमण थाटल्यामुळे येथे वारंवार वाहतुक विस्कळीत होतांना दिसून येत आहे या महामार्गावर चक्क रविवारी तीन तास वाहतुक ठप्प झाल्यामुळे रस्त्यावरुन मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांच्या हॉर्न वाजविण्याचा कर्णकर्कश आवाज आरडा – ओरड आणि रस्त्यावरील गर्दीमुळे व्यावसायिकांतून तिव्र संताप व्यक्त करण्यात आला
नेवासा पोलीस ठाण्यात वाहतुक नियंञण करण्यासाठी नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी या वाहतुकीकडे वेळीच लक्ष देत नसल्यामुळे अनेकदा वाहतूक विस्कळीत होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे महामार्गावरील अतिक्रमणे कायमस्वरुपी हटविण्याची नितांत गरज असल्याचे स्थानिक व्यावसायिकांतून बोलले जात आहे