बेल्हे (प्रतिनिधी):- कांदळी (ता.जुन्नर) येथील मोकसबाग वस्तीमधील एका गर्भवती महिलेचा कोरोनामूळे मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून तालुक्यातील रुग्णांची संख्या आता ३९ वर गेली आहे. तर कोरोनामूळे बळींची संख्या दोनवर गेली आहे.
कांदळी गावातील मोकसबाग शिवारात एका गर्भवती महिलेचा कोरोनाची लागण झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर महिलेच्या पतीचे कांदळी फाटा येथे टायर पंचर चे दुकान आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना त्यातील त्याच्या व्यवसायामुळे एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात सदर व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्य आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सदर कुटुंब हे बाहेरील राज्यातील असून मोकसबाग येथील स्थानिक नागरिकांच्या घरी भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहे. कोरोना बाधित मयत गर्भवती महिलेच्या कुटुंबातील चारही व्यक्तींना लेण्याद्री येथील कोवीड सेंटरमध्ये पुढील तपासणी करता पाठविले असल्याची माहिती गावचे सरपंच विक्रम भोर यांनी दिली.
या विभागात जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, ग्रामसेवक रंजना ढोकळ, तलाठी अमर खसाळे तसेच अन्य शासकीय टीमने या ठिकाणी भेट देऊन सदर विभागात कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे.
या विभागात प्रवेशास बंदी केलेली आहे.सदर विभागातील ग्रामस्थांनी आपल्या घरात सुरक्षित राहून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.तसेच होम क्वारंटाईन केलेल्यांनी गावात फिरू नये, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात साबणाने धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावे, कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, शक्यतो घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.