जुन्नर – जुन्नर तालुक्यातील करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि. 18) सायंकाळी 256वर पोहोचली आहे. त्यामुळे तालुक्यातील 145 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 105 जणांनी करोनावर मात केली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
या ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 122 तर लक्षणे असलेल्या केवळ 23 व्यक्ती आहेत. या बाधित रुग्णांपैकी 113 रुग्ण लेण्याद्री येथे उपचार घेत असून 23 रुग्ण पुण्याच्या विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
तर 20 जणांना होम आयसोलेटेड केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 1411 हाय रिस्क गटांतील व्यक्ती असून 1065 जण लो रिस्क गटांतील आहेत.
दरम्यान, शनिवार (दि. 11) पासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना बधितांच्या संख्येत थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लेण्याद्री येथे स्वॅब देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असून ओझर येथे हे चाचणी केंद्र नव्याने उभारण्यात येणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे चाचणीसाठी ओझर आणि त्या चाचणीत पॉझिटिव्ह आले तर लेण्याद्री अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.