…मग उद्घाटन का केले? ‘जम्बो’ अजूनही अपुऱ्या क्षमतेनेच

उद्घाटन होऊन तीन आठवडे उलटले, तरी घडी बसेना

पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयाचे उद्घाटन होऊन तीन आठवडे उलटले, तरी अद्याप त्याची घडी पूर्णपणे बसली नाही. सुरूवातीला झालेला बराच गोंधळ आता सावरत असून, जम्बोची गाडी जवळपास निम्मी रुळावर आली आहे.

 

शहरातील बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे रुग्णालय उभाण्यात आले. यामुळे आता करोनाबाधितांचा प्रश्न सुटणार, अशी आशा निर्माण झाली होती, मात्र ज्या एजन्सीला हे रुग्णालय चालवण्यासाठी दिले होते, ते यात असमर्थ ठरले. त्यांनी याठिकाणी डॉक्टर्स आणि अन्य मनुष्यबळच न पुरवल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यातून दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जम्बोच्या व्यवस्थापनावर अधिकच ताशेरे ओढले गेले. त्यानंतर या एजन्सीला डच्चू देण्यात आला आणि पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरचे काम पाहणाऱ्या एजन्सीला हे काम देण्यात आले.

 

महापालिकेने येथील व्यवस्था सुधारण्यासाठी आठ अधिकाऱ्यांची समन्वय समिती तयार केली. येथील खाटांपासून ते रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळावी, यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. स्वत: उभे राहून या अधिकाऱ्यांनी येथे काम करून घेतले. त्यातून आता किमान 250 रुग्णांना या ठिकाणी उपचार देणे सुकर झाले. येथे डॅशबोर्ड तयार करण्यात आला असून, नातेवाईकांना रुग्णांशी बोलता यावे, यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय उपलब्ध बेड्सची माहिती, प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीच्या सद्यस्थितीची डॅशबोर्डवर पाहता येणार आहे.

जम्बोमधील सद्यस्थिती

  • आतापर्यंत एकूण दाखल झालेले रुग्ण – 550
  • एकूण बरे झालेले – 257
  • वैद्यकीय सल्ल्याने घरी गेलेले – 52
  • मृत्यू – 67

जम्बोमधील रुग्णांची प्रकृती ठीक व्हावी आणि कोणाचे प्राण जाऊ नयेत, ही आमची प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने येथील व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करून उपचारांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सोमवारी जम्बोमध्ये 175 बेड होते. बुधवारी त्यांची संख्या 250 वर गेली आहे. शुक्रवारपर्यंत आम्ही 300 बेड वाढवणार आहोत.

– रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा

Leave A Reply

Your email address will not be published.