बाबरी प्रकरणाचा निकाल 30 सप्टेंबर रोजी

लखनौ – आयोध्येतील बाबरी मशिद पाडली जाण्याच्या प्रकरणाचा अंतिम निकाल सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्यावतीने 30 सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. यादव यांनी 30 सप्टेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. 

बाबरी मशिद पतन प्रकरणातील एकूण 32 आरोपी असून त्यामध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती आणि विनय कटियार हे प्रमुख आरोपी आहेत.

बचाव पक्ष आणि सरकारी बाजूाचा युक्तिवाद 1 सप्टेंबर रोजी समाप्त झाला असून त्यानंतर विशेष न्यायाधीशांनी निकाल लेखनाचे काम सुरू केले असल्याचे सीबीआयचे वकील ललित सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

सीबीआयने या प्रकरणी 351 साक्षीदार सादर केले आणि तब्बल 600 दस्तऐवज पुरावे म्हणून न्यायालयात सादर केले आहेत. आयोध्येतील बाबरी मशिद 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी उद्‌ध्वस्त केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.